जळगाव ;- भडगाव तालुक्यातील कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हाताला जखम असलेला एक अनोळखी इसम इलाज करून घेण्यासाठी आला होता . मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला जखम कशामुळे झाली याची विचारणा केली असता त्याने रागाच्या भरात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून खुर्च्या आणि दरवाजाच्या काचांची नासधूस केल्याचा प्रकार २४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला . या घटनेमुळे आरोग्य कर्मचारी आणि इतर रुग्नांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला . याबाबत पोलिसांत अदखलपात्र तक्रारीची नोंद करण्यात आली आहे . तसेच तोडफोड करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला पोलीस पाटील , सरपंच आणि इतर काही व्यक्तींकडून मध्यस्थी करून वाद मिटविण्यात येऊन तरुणाकडून लेखी आश्वासन घेऊन त्याला समज देऊन सोडण्यात आले . दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार घडत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येत असून याकडे जिल्हा आरोग्याधिकाऱ्यानी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान या घटनेत एक कर्मचारी जखमी झाला असून तो रजेवर गेला आहे . अशा गंभीर प्रकरणाची दखल न घेता केवळ एनसी दाखलकरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
——