जळगांव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आज रोजी विद्यापीठे व महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांना मराठीचे अध्यापन सक्तीचे असावे या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन गुगल मीट व्दारे करण्यात आले.

विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडया अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आजच्या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु.पगारे होते. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मुक्ता महाजन यांनी आपण ग्लोबलच्या नादात लोकल विसरत चाललो आहोत. सरकारच्या धोरणांमुळे इतर भाषांकडे जाण्याचा कल वाढतोय मात्र मराठी अनिवार्य करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. प्रा.आशुतोष पाटील यांनी त्रिभाषासुत्राबददल माहिती देवून मराठीला विशेष महत्त्व असायला हवे हे सांगितले. केवळ औपचारिकता न ठेवता मार्मिक दृष्टीने मराठीचा विचार व्हावा तसेय व्यावहारिक अडचणींमुळे मराठीला बगल द्यावी लागू नये असेही त्यांनी नमूद केले. जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रा.विनोद निताळे यांनी मातृभाषेतून शिकविल्या शिवाय त्यातील बारकावे, गोडवा कळणार नाही हे त्यांनी विशद केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रा.विजय घेारपडे यांनी तत्त्व-व्यवहार, उक्ती-कृती यातील तफावत स्पष्ट केली. हिंदी विभागप्रमुख प्रा.सुनील कुळकर्णी यांनी शालेय स्तरापासूनच मराठीचे बाळकडू अनिवार्य असावे हे स्पष्ट केले. इतर भाषेला मनाई नाही परंतू राजभाषा यायलाच हवी. नेत्रा उपाध्ये यांनी उपयोजित लेखन हा विषय सर्वच ठिकाणी शिकविण्यासाठी असावा हे सांगितले. पूजा निचोळे यांनी शासकीय पातळीवरही राजभाषा मराठीला दुय्यम स्थान यावर चिंता व्यक्त करुन शासकीय स्तरावर कठोर पावले उचलली जावीत असे सांगितले. मनिषा महाजन यांनी गरज ही शोधाची जननी आहे असे सांगून मराठी भाषा शिकण्याची गरज निर्माण झाली पाहिजे हे नमूद केले. हैदराबाद येथील कुणाल रामटेके यांनी व्यावहारिक ज्ञान हे मातृभाषेतूनच द्यायला हवे हा आग्रह मांडला.
अध्यक्षीय मनोगतात प्रा.पगारे यांनी मराठी साठी विद्यापीठे स्थापून मराठीचा प्रश्न सोडविला जाणार नाही फक्त वरपांगी चिंता नको तर मराठी ज्ञानभाषा व्हावी हे नमूद केले. विद्यापीठातील व्यवस्थापन इंग्रजी सोबतच मराठी व्हावे हे सांगितले. मराठी टिकविणे हे राजकारण्यंाची नैतिक जबाबदारी आहे फक्त् कायदा करुन जमणार नाही तर भक्कम उपाययोजनाही हवी हे ही विशद केले. मराठीचे संवर्धन होण्यासाठी कोणत्याही स्तराला जावून संघर्ष करायला हवा आणि मराठी ज्ञानभाषा व्हावी हा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील अहिरे तसेच आभार कृष्णा संदानशिव यांनी मानले. या परिसंवादास प्रशाळेतील शिक्षक तसेच इतर महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.







