वॉशिंग्टन – संपूर्ण जगाला करोनाने वेठीस धरल्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पेचप्रसंगात एक गुड न्यूज समोर आली आहे. जगभरातील 10 लाखांहून अधिक करोनाबाधित रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रूग्ण करोनामुक्त होण्याचे ते प्रमाण जगातील एकूण बाधितांच्या सुमारे एक-तृतीयांश इतके आहे.
जगातील 211 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्या विषाणूची बाधा जगभरातील 32 लाखांहून अधिक रूग्णांना झाली आहे. त्यातील 2 लाख 29 हजारांहून अधिक रूग्ण आतापर्यंत दगावले आहेत. करोनाने सर्वांधिक कहर अमेरिकेत केला आहे. त्या देशातील बाधित आणि बळींची संख्या जगात सर्वांधिक आहे. एकट्या अमेरिकेत 10 लाखांहून अधिक रूग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
त्या देशात करोनाने जवळपास 62 हजार रूग्णांचा बळी घेतला आहे. त्याखालोखाल इटलीत 27 हजारांहून अधिक तर ब्रिटनमध्ये 26 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. स्पेन आणि फ्रान्समधील बळींच्या संख्येने 24 हजारांचा टप्पा पार केला आहे. बेल्जियममध्ये 7 हजार 500 हून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
तर जर्मनी आणि इराणमधील मृतांच्या संख्येने 6 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. खंडनिहाय विचार करता युरोपला करोना संकटाचा सर्वांधिक फटका बसला आहे.