मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकारांना माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून आम्ही महायुती करणार आहोत. महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार आहोत. जागा वाटपाचे सूत्र आणि उमेदवारांची यादी उद्या रविवारी दुपारी फायनल होईल आणि ती आम्ही ३० तारखेला जाहीर करू अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिली.

भारतीय जनता पक्षातर्फे जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये महायुती मिळून भाजप लढणार असल्याचे आता स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दि. २७ रोजी संध्याकाळी भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळेला बोलताना ना. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना शाब्दिक चिमटे घेतले. तिकीट वाटप लवकरच जाहीर होणार असून ज्यांना तिकीट मिळाले त्यांनी जोमाने कामाला लागायचे आहे. तसेच ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी नाराज व्हायचे नाही. त्यांना पक्षातर्फे भविष्यात दुसऱ्या भूमिका दिल्या जातील. सर्वांनी पक्षासाठी मिळून लढायचे आहे. दिलेल्या उमेदवाराचा जोमाने प्रचार करून महायुतीला मोठ्या बहुमताने निवडून आणायचे आहे असे ते म्हणाले.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आमच्या चर्चा सुरू असून आम्ही महायुती म्हणून लढावे असे वरतून हायकमांडकडून आदेश आलेले आहेत. मी उद्या रविवारी दुपारपर्यंत जळगावात आहे. तोवर आम्ही जागावाटप फायनल करून उमेदवारांची यादी अंतिम करणार आहोत. ३० तारखेला ती आम्ही सकाळी जाहीर करू असे आमचे साधारण नियोजन असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान निवडणुकीमध्ये अनेक नाराज निष्ठावंत व कार्यकर्ते बंडखोरी करतील किंवा अपक्ष लढवतील याबाबत आपण काय भूमिका घ्याल ? या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले की, बंडखोरांसाठी आमच्याकडे औषध उपलब्ध आहे. आम्ही त्याचा वापर करू. भविष्यामध्ये शिस्तभंगाची कार्यवाही त्यांच्यावर करू. बंडखोरांनी समजून घ्यावे असे मी आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.









