‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची पातळी तपासण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जळगाव तालुक्यात दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची ए.आय. आधारित ‘निपुण महाराष्ट्र ॲप’ वापरून चाचणी सुरू झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या प्रेरणेने आणि डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी नशिराबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नुकतीच ए.आय. आधारित चाचणी घेतली. या ॲपमध्ये कोणत्याही शाळेची निवड केल्यावर दहा विद्यार्थ्यांची यादृच्छिक नमुना पद्धतीने निवड होते. या विद्यार्थ्यांची वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या चार प्रमुख घटकांवर चाचणी घेतली जाते. यात, प्रत्येक विद्यार्थ्याची नेमकी पातळी निश्चित केली जाते.
विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची आणि उत्तरांची छायाचित्रे ॲपमध्ये जतन केली जातात. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या वाचनाची पडताळणी करताना त्यांचा आवाज ध्वनिमुद्रित केला जातो. यामुळे, शाळेच्या गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे शक्य होते, तसेच विद्यार्थी नेमक्या कोणत्या स्तरावर आहेत, हे शिक्षक आणि पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना सहज कळते. शिक्षक आणि मुख्याध्यापक देखील सरावासाठी या ॲपचा वापर करू शकतात. सध्या नशिराबाद बीटमधील सर्व शाळांची ऑनलाइन पडताळणी ‘निपुण महाराष्ट्र ॲप’द्वारे केली जाणार असून, विद्यार्थ्यांना अपेक्षित गुणवत्ता मिळवण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन पुरवले जाणार आहे. या उपक्रमाला मुख्याध्यापक अरुणा नेहेते आणि शिक्षक रजेसिंग गिरासे, तसेच नशिबा तडवी यांचे सहकार्य लाभले.