अमळनेर तालुक्यात जानवे गावाजवळ घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गर्भवती नीलगायीचा मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली. जानवे गावाजवळ एक नीलगाय जखमी अवस्थेत असल्याची माहिती वन कर्मचाऱ्याना शेतकऱ्यांनी कळवले. मात्र नीलगाय सापडली नाही. पुन्हा दुसऱ्यांदा सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतकऱ्याने जखमी निलगायीची माहिती दिल्यावर वनकर्मचार्यांनी निलगायीचा शोध घेतला.
घटनास्थळी एका चारचाकीचे काच पडलेले होते व ३० फुटाच्या अंतरावर जखमी अवस्थेत नीलगाय आढळून आली. तात्काळ वनरक्षक रामदास वेलसे , जानव्याचे पशु वैद्यकीय अधिकारी थोरात यांनी भेट देऊन गाईवर उपचार केले. नीलगायीचे पुढचे पाय तुटलेले होते. तेथून निलगायीला अमळनेर येथे पशु वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र गाढे यांनी प्रथमोपचार केले. मात्र तोपर्यंत गायीचा मृत्यू झाला होता. गाय गर्भवती असल्याचे डॉ गाढे यांनी सांगितले. वनरक्षक रामदास वेलसे यांनी नीलगायीवर जानव्याच्या जंगलात अंत्यसंस्कार केले.