भुसावळ बाजारपेठसह एलसीबीची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील चहाच्या दुकानात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता गोळीबार करून तेहरीम नासीर शेख याचा खून करण्यात आला होता. जळगाव एलसीबी आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ५ संशयित आरोपींना मनमाड, चंद्रपूर येथून संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतूस, १ रिकामी पुंगळी हस्तगत करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे. आणखी दोघे संशयित ताब्यात घेण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. प्रसंगी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ आदी उपस्थित होते. शुक्रवारी तेहरीम नासीर शेख (वय-२७, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हा चहा पिण्यासाठी जाम मोहल्ला भागातील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात सकाळी साडेसात वाजता आला होता. दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयीतांनी गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून तेहरीम याचा खून केला होता. खून प्रकरणी तनवीर मजीद पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख रशिद, मजीद पटेल, अदनान उर्फ काल्या शेख युनुस सर्व रा.भुसावळ यांचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेपासून आजपावेतो सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते. दि.११ रोजी संशयित आरोपी सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (वय ३२ रा.पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) याच्यासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, गजानन देशमुख, संघपाल तायडे, महेश सोमवंशी, सचीन पोळ यांनी बल्लारशाह जि.चंद्रपुर येथुन ताब्यात घेवुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
गुन्ह्यातील इतर फरार आरोपी हे मनमाड शहराचे जवळपास असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाल्याने त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. नमुद पथक यांनी संशयित आरोपी नामे अदनान शेख युनुस (वय २९ रा.आगाखान वाडा भुसावळ), शेख साहील शेख रशीद (वय २१, आगाखान वाडा), यांच्यासह अब्दुल नबी हनीफ पटेल (वय ३१ रा.शेरा चौक मास्टर कॉलनी, रा. जळगाव), सनीस नाइन मोहमद आसीफ (वय १९ रा. एमआयडिसी एरीया जळगाव) अशांना शिताफीने मनमाड परिसरातुन ताब्यात घेतले.
चौघांकडून ४ गावठी पिस्तुल, ३ जीवंत काडतूस आणि १ रिकामी पुंगळी हस्तगत केली आहे. दरम्यान फिर्यादीतील दाखल संशयित अन्वर पटेल, मजीद पटेल, तनवीर मजीद पटेल हे अद्यापि फरारी आहे.