भुसावळ तालुक्यातील दर्यापूर शिवारातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरातील दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमराव इंगळे (वय-७४, रा. दर्यापूर शिवार, वरणगाव ता.भुसावळ) असे मयत इसमाचे नाव आहे. भीमराव इंगळे हे वृद्ध शुक्रवारी दिनांक १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता भुसावळ तालुक्यातील दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर पायी जात होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत भीमराव इंगळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.