जळगाव शहरात गजानन कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती देत तब्बल ७५ लाखात फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात ७ जणंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंटमध्ये शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (वय ६५) या वकील राहतात. जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करून त्या आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या ओळखीतले मनीष सतीश जैन याने त्यांना कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीचे रियल इस्टेट व बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे व्यवहारासाठी रकमेची आवश्यकता असल्याने, तुम्ही पैसे दिल्यास दीड टक्के प्रती महिन्याच्या व्याजाचा आकर्षक परतावा देईल, असे सांगून त्याने शिरीन अमरेलीवाला यांचेकडून डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२५ पर्यंत या कालावधीत एकुण ७५ लाख रुपये घेतले.
या कट कारस्थानमध्ये संशयित म्हणून मनीष जैन, त्याचा भाऊ अतुल सतिष जैन, त्याची आई यशोदा सतीष जैन (तिघे रा.यश प्लाझा, जळगाव), जाफरखान मजीद खान (रा.सुप्रीम कॉलनी), विजय इंदरचंद ललवानी (रा.सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा.गोलाणी मार्केट) आणि कंपनीचे सेक्रेटरी असे नाव सांगणार्या केतन किशोर काबरा (रा.जयनगर) याचा सहभाग आहे. दरम्यान शिरीन अमरेलीवाला यांना ऑगस्ट २०२४ मध्ये पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी मनीष जैन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी मनीषने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तसेच त्याच्या घरातील अतुल सतीश जैन, त्याची आई यशोदा सतीश जैन यांनी धमकावत पैसे मिळणार नाही, तुमच्याकडून काय करायचं आहे करून घ्या, असे सांगून धमकावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिरीन अमरेलीवाला यांनी मंगळवार ७ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूक करणार्या ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहे.