नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशाची राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नवीन प्रकरणांनी सर्व विक्रम मोडले आहेत. २४ तासांत दिल्लीत ११०६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूची संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.


मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीत रुग्णांची संख्या वाढत आहे, पण रुग्ण बरे देखील होत आहेत. सुमारे ५० टक्के लोक बरे होत आहेत. ते म्हणाले की, असे दिसून येत आहे की ८० टक्के लोक घरीच राहून बरे होत आहेत, त्यामुळे लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही.
ते पुढे म्हणाले की, खोकला, ताप असेल आणि कोरोनाचे लक्षण नसेल तर रुग्णालयात जाण्याची गरज नाही. आपण घरीच एका स्वतंत्र खोलीत राहू शकता आणि काळजी घेऊ शकता. कोरोना काही स्पर्शातून होणारा आजार नाही, कोरोना स्पर्शामुळे होत नाही.







