भुसावळ तालुक्यातील निंभोरा शिवारातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळकडून वरणगाव रस्त्यावरील निंभोरा शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे मावसभाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबरला रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी १ जानेवारीला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील सरफराज युनूस पिंजारी (वय २७) हा तरूण ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता त्याचा मावसभाऊ व रावेर तालुक्यातील खिरोदा येथे राहणाऱ्या अनिस शकील पिंजारी यांच्यासोबत दुचाकीने वरणगावकडून भुसावळकडे जात होता. याच रस्त्यावरील निंभोरे शिवारातील शेताजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत सरफराज पिंजारी व त्याचा मावसभाऊ अनिस पिंजारी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी १ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पो.हे.कॉ. योगेश पालवे करत आहेत.