जळगावातील महापालिकेचे पाईप चोरी प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- शहराला पाणीपुरवठा करणारी बिडाचे पाईप चोरी प्रकरणी मनपा माजी विरोधीपक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांच्यासह सात जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात एक तर तालुका पोलीस ठाण्यात दोन असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून उर्वरीत मात्र अद्याप फरार आहे. मुख्य संशयित सुनिल महाजन यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर बुधवारी न्या. वावरे यांच्या न्यायालयात कामकाज पार पडले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर आता शनिवारी ४ रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.
महापालिकेने भंगार साहित्य विक्रीसाठीचे कंत्राट काढले होते. त्यामध्ये चोरीस गेलेल्या पाईपांचा उल्लेख नव्हता. तसेच टेंडरची मुदत ही मे महिन्यात संपली होती, भंगार साहित्य काढण्याचे कुठलेच काम बाकी नव्हते. मात्र त्या टेंडरच्या आड लपून संशयितांनी जमिनखाली असलेली पाईप काढतांना त्यांना रंगेहाथ पकडल्याने या घटनेचा उलगडा झाल्याचा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयात केला. महाजन यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर गुरुवारी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. काबरा यांनी युक्तीवाद केला. यावेळी युक्तीवादात त्यांनी महापालिकेने काढलेले कंत्राट हे भंगार साहित्यासाठीचे होते. त्यामध्ये पाईपांचा कुठेही उल्लेख नव्हता. सुनिल महाजन यांनी त्यांचा साथीदार भंगार ठेकेदार सादीक खाटीक याच्यासोबत संपर्क साधून ते कंत्राट घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.
भंगार साहित्याचे कंत्राटाची मुदत ही मे २०२४ मध्येच पुर्ण झाली होती. त्यामुळे मनपाचे भंगार गोळा करुन ते उचलण्याचा कुठलेही काम बाकी नव्हते. असे असतांना देखील त्या कंत्राटच्या नावाखाली शहराला पाणीपुरवठा करणारी ब्रिटीशकालीन पाईप काढण्याचे काम सुरु होते. तसेच ज्याठिकाणी पाईप काढण्याचे काम सुरु होते. तेथे असलेल्या एका शेतकऱ्यासोबत महाजन यांनी संपर्क साधून पाईप काढण्याचे सांगितल्याचे देखील त्यांनी युक्तीवादात सांगितले. सुनिल महाजनांच्या भंगारचे कंत्राट सांभाळणारा सादीक बिसमिल्ला खाटीक याच्या बँक खात्यातून मूळ कंत्राटदार अभय शिंदे याच्या कंपनीच्या नावावर पैसे वर्ग झाले आहे. त्यामुळे खाटीकच्या माध्यमातून सुनिल महाजन यांचा या गुन्ह्याशी संबंध दिसून येत आहे. तसेच भंगार व्यावसायीकांनी चोरलेले पाईप खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी मुख्य संशयित सुनिल महाजन यांच्या मोबाईलचा सीडीआरद्वारे तपासला असता, त्यामध्ये महाजन यांनी भंगार ठेकेदार सादीक खाटीकसोबत १४१ वेळा, अक्षय अग्रवालसोबत ७३६ वेळा, कुंदन पाटीलसोबत ५४७ वेळा तर निरंजन पाटीलसोबत १०५७ वेळा त्यांचे संभाषण झाल्याचे उघड झाले आहे. पाईप चोरी प्रकरणातील मुख्य संशयित सुनिल महाजन यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपुर्व जामीनासाठी तसेच रामानंद व तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाईप चोरीच्या गुन्ह्यातील संशयित सादीक खाटीक, कुंदन पाटील व भावेश पाटील यांच्या जामीन अर्जावर देखील न्या. बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात युक्तीवाद झाले. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर त्याच्या जामीनावर ४ रोजी निर्णय होणार आहे.