जळगाव शहरातील डॉ. उभाड पाटील यांच्या दवाखान्यातील प्रकार, मेडिकल चालकाला मारहाण करून परिचारिकांच्या मागे धावले !
वंशिका पंकज बाविस्कर (वय ७ महिने रा. पिलखेडा ता. जळगाव) ही मुलगी जळगाव तिच्या परिवारासह राहते. तिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नातेवाईकांनी तिला नूतन मराठा महाविद्यालयाच्या पुढील डॉ. उभाड पाटील यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. (केसीएन)दरम्यान उपचार सुरू असताना तिला निमोनिया हा आजार झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले होते. यावेळी डॉक्टरांनी तिला ॲडमिट केले व पुढील धोक्यांसंदर्भात नातेवाईकांना कल्पना दिली. त्यानंतर तिची प्रकृती आज दुपारी ४ वाजता खालावल्यामुळे नातेवाईकांनी तिला आकाशवाणी चौकातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र बाळाची प्रकृती अधिक खालावल्यामुळे नातेवाईक पुन्हा उभाड पाटील यांच्या दवाखान्यात आले.
त्या ठिकाणी थेट परिचारिका आणि औषध व्यवसायिक यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तेथील एलईडी टीव्ही, खुर्च्या, टेलिफोन, फ्रिज यासह खिडक्यांच्या काचांची प्रचंड तोडफोड केली. (केसीएन)यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिका स्वाती सोनवणे, कल्पना वाघ, प्रमिलाबाई पिंगळे यांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले.
गणेश मेडिकलचे मानस ठोके यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही नातेवाईकांनी मारहाण केली. नंतर ते बाळाला घेऊन दुसरीकडे निघून गेले. हा प्रकार डॉ. दिलीप उभाड पाटील यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनीही भेटी दिल्या आहेत. सदर घटनेबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.