छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील घटना
पहूर ( प्रतिनिधी ) – पहूरपासून काही अंतरावर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ४ जण जखमी असून, १ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. घटनेची पहुर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील ब्रह्मांडे परिवार कारने पुण्यावरून जळगाव येथे येत होता. पहूर काही अंतरावर असताना कार रस्त्याच्या कडेला फेकली गेल्याने मोठा अपघात घडला आहे. यात गोपाल यादव ब्रह्मांडे (वय ५२), सुरेखा गोपाल ब्रह्मांडे, रक्षता ब्रह्मांडे (वय १), विजया ब्रह्मांडे (वय ३०) हे जखमी आहेत. पैकी सुरेखा ब्रह्मांडे गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस कर्मचारी मनोज धनगर, हेमंत सोनावणे दाखल होऊन यांनी मदतकार्य केले. जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. याबाबत पहूर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.