जामनेर तालुक्यात शेतकरी, व्यापाऱ्यांमधील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेंदुर्णी येथील गोपाल अॅग्रो इंडस्ट्रीज येथे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर बुधवारी दुपारी काही शेतकरी व जिनिंग मालक यांच्या वादावादी झाल्याची घटना घडली. केंद्रावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून संबंधित शेतकऱ्यांविरुद्ध व शेतकऱ्यांनी जिनिंग मालकाविरुद्ध परस्परविरोधी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पहूर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
गोपाल अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू असताना अज्ञात दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी सीसीआय अधिकारी कमलप्रसाद कल्याणमल मीना यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी संबंधित शेतकरी सोमनाथ प्रल्हाद पाटील (वय ४५, बिलवाडी) व एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ पाटील यांनीही फिर्याद दिली असून, कापूस जिनिंगमध्ये विक्रीसाठी घेऊन गेले असता अर्धा कापूस खरेदी केला. यादरम्यान गुड्डू ऊर्फ नीलेश अग्रवाल यांचा सीसीआयशी संबंध नसताना जिनिंगमधून बाहेर काढून दिले.
बुधवारी उर्वरित अर्धा कापूस घेऊन येत असल्याचे गोविंद अग्रवाल यांना सांगितले, पण त्यांनी नकार दिला. दुसऱ्या दिवशी आपण राहुल पाटील यांच्यासह गेल्यावर गोविंद मुरलीधर अग्रवाल (वय ६५), नितीन गोविंद अग्रवाल, नीलेश ऊर्फ गुड्डू अग्रवाल, गोपाल नितीन अग्रवाल यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भारत दाते करीत आहेत.