अमळनेर पोलीस स्टेशनला पती, नणंदेविरुद्ध गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) :- चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पती, नणंदेच्या जाचाला कंटाळून शिरूडच्या विवाहितेने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. २ नोव्हेंबर रोजी सुकवद ता. शिंदखेडा येथे घडली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा आनंदराव वाघ (वय ४२) या महिलेचा पती सतत दारू पित असल्याने ती आपल्या माहेरी शिरूड ता. अमळनेर येथे राहत आहे. तिची मुलगी सुज्ञानी राहुल ढिवरे (वय २४ वर्षे) हीचा विवाह ५ मे २०२४ रोजी शिरपूर तालुक्यातील सावेर येथील राहुल जगन ढिवरे याच्याशी झाला होता. जावई राहुल काहीच काम करीत नव्हता. म्हणून तिची मुलगी सुज्ञानी ही अमळनेर येथे एमएसईबीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत होती. ती रोज एसटीने शिरपूरहुन ये जा करीत होती. राहुलची बहीण आणि राहुल हे तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तू कुठे आहेस ? व्हिडीओ कॉल कर, तुझ्या शेजारी कोण आहे ते दाखव असे सांगून मानसिक त्रास देत होते. याबाबत मुलीने आईकडे वारंवार तक्रारी करून तिला मारहाण केली जात असल्याचेही सांगितले होते.
दि. २ नोव्हेंबर रोजी सुज्ञानी भाऊबीजेसाठी येणार होती. मात्र तीचा फोन बंद येत असल्याने तिचा मामा नंदलाल बैसाणे याने राहुलला फोन करून विचारले की अजून भाची आली नाही. तेव्हा राहुलने सांगितले की तुमची भाची सुज्ञानीचा एसएमएस आला आहे की ती सावळदे पुलावर उभी आहे. तेथे काय करीत आहे तिला तूच विचार. तिने आत्महत्या केली तरी मला काही घेणे नाही म्हणून फोन कट केला. नंदलाल याने ४ रोजी अमळनेरला हरवल्याची तक्रार दाखल केली. १७ नोव्हेंबरला एक तरुणीचा मृतदेह तापीत सापडल्याची माहिती मिळाल्यावर शिंदखेडा पोलीस स्टेशनला गेले. दि. १६ रोजी अंत्यसंस्कार झाले होते. मात्र तिचे कपडे राखून ठेवले होते. कपड्यावरून ती सुज्ञानी असल्याची खात्री झाली. मुलीच्या आईने तक्रार दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला मयताचा पती राहुल व नणंद छाया यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करून गुन्हा शिंदखेडा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.