धरणगाव तालुक्यातील नांदेड फाट्यावरील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नांदेड फाट्याजवळ दुचाकीवर येणाऱ्या दांपत्याला धमकावून त्यांच्या खिशातील रोकड, मोबाईल आणि जवळ असलेली दुचाकी जबरदस्ती हिसकावून लांबवल्याची घटना रविवारी दि. १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागीराम कुवरसिंग बारेला (वय-१९, रा. धनवाडी ता. चोपडा) हा तरुण मुलगी बघण्यासाठी त्याचे मावसा आणि मावशी यांच्यासोबत रविवारी १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या दुचाकीने जात होते. दरम्यान भागीरम बारेला हा पुढे जात होता, तर त्याचे मावसा आणि मावशी हे मागे दुसऱ्या दुचाकीने येत होते. धरणगाव तालुक्यातील नांदेड फाट्याजवळ अज्ञात चार जणांनी दुचाकीवर येऊन भागीराम बारेला याचे मावसा आणि मावशी यांची दुचाकी अडविली आणि त्यांना धमकावत त्यांच्याजवळील मोबाईल, पाचशे रुपयांची रोकड आणि त्यांच्याजवळ असलेली दुचाकी जबरदस्ती हिसकावून चोरून पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर भागीराम बारेला याने धरणगाव पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चार जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे.