भुसावळ तालुक्याला पुन्हा मंत्रीपदाचा मान
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय वामन सावकारे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून फोन आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच शपथ घेण्यासाठी आमदार सावकारे यांना दुपारी ४ वाजता बोलवण्यात आले असून ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आमदार संजय सावकारे यांची आमदार म्हणून चौथी टर्म आहे. २००९ साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यावर ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात त्यांच्याकडे मंत्रिपद देखील आले होते. त्यामुळे पक्षाकडून सावकारे यांना संधी देण्यात आली आहे.
सकाळी पक्षाकडून फोन येताच संजय सावकारे हे भुसावळ येथून नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. भुसावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. भुसावळ तालुक्याला पुन्हा मंत्रीपदाचा मान मिळाल्यामुळे आता तालुक्यातील व मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणखी वेगाने सुटतील अशी आशा जनतेला लागून आहे.