जळगाव तालुक्यातील विटनेरजवळ घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विटनेर गावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गीता भगवान पाटील (वय ४२, रा.माळपिंप्री ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील माळपिंप्री गावात गीता पाटील या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्या २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांचा पुतण्या गणेश भास्कर पाटील (वय ४०) यांचेसह सकाळी दुचाकीने वावडदा येथे जात होत्या. तेव्हा विटनेर गावासमोरील शिव ढाबा समोर भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गीता पाटील ह्या रस्त्यावर पडल्या. क्षणात त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी नातेवाईकांनी शोक व्यक्त केला. पुतण्या गणेश भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर बळीराम दाढे (वय २५ रा. पळासखेडे मिराचे ता. जामनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.