जामनेर तालुक्यातील हिवरखेडा रस्त्यावरील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील शास्त्री नगर भागातील तरुणाचा हिवरखेडा रस्त्यावर भीषण अपघातामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याची दुचाकी झाडाला आढळल्यामुळे हा अपघात झाला. घटनेची जामनेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
शास्त्री नगर भागातील रहिवासी मनोज बाविस्कर याचा आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हिवरखेडा रोड येथे मोटारसायकल वरून जात असताना त्यांची मोटारसायकल झाडाला धडकली. या अपघातात मनोज बाविस्कर गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले.
परंतु जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार चालू असताना त्याची प्राणजोत मावळली. कुटुंबाने एकच आक्रोश केला. मनोजच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. एकुलता एक कर्ता पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनेमुळे शास्त्री नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.