वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी घटना, भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील अपघात
भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोळगावजवळ पाटाच्या पाण्याच्या परिसरात दुचाकी खड्ड्यांमध्ये आदळल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. नेमका त्याच दिवशी त्यांचा दि. ५ रोजी वाढदिवस होता. यामुळे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
वाल्मीक मधुकर पाटील ( वय ४९) हे आमडदे ता. भडगाव येथील साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक शाळेत कर्मचारी होते. वाल्मीक पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन बहिणी, मुले असा परिवार आहे.मुलांना लागणारी शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी अमळनेर येथे दुचाकीने गेले होते. (केसीएन) अमळनेर येथील काम आटोपून सायंकाळी ५ वाजता भडगाव येथे यायला निघाले. कोळगाव येथील नातेवाइकाकडे जायचे असल्याने त्यांनी वाहन कोळगावकडे वळविले.
शिंदी ते कोळगावदरम्यान पाटाजवळ खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यांची दूचाकी उधळून ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यात वाल्मीक पाटील यांना डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.(केसीएन)वाढदिवसाच्या दिवशीच वाल्मीक पाटील यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. भडगाव येथे आल्यानंतर वाढदिवस साजरा करून ते परिवारासह आमडदे येथे गावाच्या यात्रेला जाणार होते.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर मूळ गावी आमडदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी ‘पप्पा… आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे… लवकर या… राम व कृष्णा या दोन्ही मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अमळनेर येथे शोककळा पसरली आहे.