नवनियुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रपरिषदेत माहिती
रडगाणे बंद करा, विकासाचे गाणे लावा : विरोधकांना टोला
मुंबई (प्रतिनिधी) :- मी यापुढेही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. पूर्वी कॉमन मॅन (सीएम) होतो. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन (डीसीएम) राहून जनतेची कामे करणार आहे. पुढील काळात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकदिलाने काम करणार आहे. मी कधीच नाराज नव्हतो. मी आधीच सांगितले होते कि, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा निर्णय घेतील तो सेनेला मान्य असेल, असे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षाने आता रडगाणे बंद करावे. विकासाचे गाणे त्यांनी लावावे, असा टोलाही त्यांनी प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर रात्री पत्रकार परिषदेत माहिती दिली. ऐतिहासिक असा शपथविधी जनतेने पाहिला. मागील अडीच वर्षातील सर्वाना आनंद, न्याय देणारे सरकार ठरले. देशाला वैचारिक दिशा देणारे महाराष्ट्र हे राज्य आहे. समाजातील प्रत्येक घटक मागील सरकारच्या पाठीशी राहिला, म्हणून मी आभार मानतो. आमच्यासाठी सत्ता हे साधन नसून जनसेवेचे माध्यम आहे, असे सांगून त्यांनी मागील काळात सरकारने केलेली कामे सांगितली.