जळगाव शहरातील घटना, फिर्यादीत विरोधी पक्षनेत्याचे नाव ?
जळगाव (प्रतिनिधी) :- गिरणा पंपिंग प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून नेताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. हा धक्कादायक प्रकार २ डिसेंबर रोजी गिरणा पंपिंग रस्त्यावर आर्यन पार्कसमोर भरदिवसा सुरू होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात महानगरपालिकेच्या एका विरोधी पक्षनेत्याचे नाव समोर येत आहे.
गिरणा पंपिंग प्लांटवरून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या ही योजना बंद आहे. गिरणा पंपिंग रस्त्यावर जेसीबीद्वारे चारी खोदून बीडाचे पाइप काढण्यात येत असल्याची माहिती ठेकेदार सुमीत सोनवणे यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांना दिली. बोरोले यांनी पंप अटेंडंट नरेश चंद्रात्रे, कर्मचारी अनिल पाटील यांना तेथे पाठविले. त्यांना नरेंद्र निवृत्ती पानगळे (३०) व रवण चव्हाण (दोघे रा. शिरसोली, ता. जळगाव) हे दोन जेसीबीच्या (क्र. एमएच. ३२, पी. ३८५५) साहाय्याने जुनी पाइपलाइन खोदून बीड धातूचे पाइप काढत असल्याचे आढळले. कोणतीही परवानगी नसताना पाइप काढण्याची हिंमत केली.
पाइप काढणाऱ्यांची चौकशी करीत असताना चव्हाण याने तेथून पळ काढला. त्या ठिकाणी अक्षय अग्रवाल नामक व्यक्ती पोहोचला. ही पाइपलाइन अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांच्या सांगण्यावरून खोदली असल्याची माहिती जेसीबी मालक व चालक पानगळे याने दिली.
चोरीच्या उद्देशाने काढलेले दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे सहा बीडाचे पाइप व दोन लाख ५० हजार रुपये किमतीचा जेसीबी तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी योगेश बोरोले यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नरेंद्र पानगळे, रवण चव्हाण, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमिन राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
नरेंद्र पानगळे याचा पाय फॅक्चर असल्याने त्याला नोटीस दिली तर उर्वरित चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बडे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. गिरणा पंपिंग योजनेचे जुने पाईप काढून चोरून नेल्याप्रकरणी या पूर्वीदेखील रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांमधील अक्षय अग्रवाल हा महापालिकेच्या भंगार साहित्य व इतर कामांचा ठेका घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्यांच्या जबाबामध्ये सुनील महाजन हे नाव समोर आले. न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर करताना सुनील वामन महाजन (रा. मेहरुण, जळगाव) असे नाव टाकण्यात आले आहे. मात्र जबाबात सुनील सुपडू महाजन असे नाव असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.