जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी (वय २४ रा. सदगुरु नगर, शिरसोली नाका, तांबापूरा, जळगाव) व निखिल उर्फ भोला सुनिल अजबे (वय २३ वर्ष, रा. लक्ष्मीनगर चाळीसगाव) यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानबध्द गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी याचेविरुध्द ११ गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तयार करुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे सादर केला. एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि शरद बागल, पोउनि. अशोक काळे, पोना योगेश बारी, किशोर पाटील, पोकों छगन तायडे, किरण पाटील अशांनी गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी यास २९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेवून त्याची मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानबध्द निखिल उर्फ भोला सुनिल अजबे (वय २३ वर्ष, रा. लक्ष्मीनगर चाळीसगाव) याचे विरुध्द भादंवि कायद्याअंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी प्रस्ताव तयार करुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे सादर केला. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी, पोउनि. सुभाष पाटील, पोहेकों योगेश मांडोळे, राहुल सोनवणे, भुपेश वंजारी, पोकों/नरेंद्र चौधरी, समाधान पाटील, राकेश महाजन, पवन पाटील, नितेश पाटील अशांनी स्थानबध्द निखील उर्फ भोला सुनिल अजबे यास २९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्याची मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे.