जळगाव शहरातील निमखेडी भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील निमखेडी शिवारात असणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरामध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी अज्ञात २ भामट्यांनी लांबवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शालिनी वामन भावे (वय ७५, रा. विठ्ठलवाडी, निमखेडी शिवार, जळगाव) या वृद्ध महिला त्यांच्या घराजवळ उभ्या होत्या. त्यावेळेला दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना पत्ता विचारला. मात्र त्यांची बोलण्याची भाषा न समजल्याने शालिनी भावे या पुढे चालू लागल्या. तेवढ्यात दोघे भामट्यांनी संधी साधून शालिनी भावे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओढून पल्सर दुचाकीवरून फरार झाले.
घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विजयसिंह पाटील व अक्रम शेख,राजू मेंढे, जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट जळगाव जिल्ह्यात सुरू असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून वचक निर्माण करण्याची गरज आहे.