भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे गृह मतदान झाल्यानंतर १०२ वर्षीय आजीबाईंनी तीन तासांनी प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी उघडकीस झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत १०२ वर्षीय द्वारकाबाई सीताराम भदाणे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पावणेतीन तासांत आजीबाईंचा मृत्यू झाला. ही घटना महिंदळे (ता. भडगाव) येथे गुरुवारी घडली.आजींच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या भाऊसाहेब भदाणे, कैलास भदाणे, प्रकाश भदाणे यांच्या आई होत्या.
वयाची शंभरी पार केलेल्या परंतु प्रकृती चांगली असलेल्या द्वारकाबाई भदाणे यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदानाचा हक्क बजावला. आजीबाईचे हे शेवटचे मतदान ठरले. मतदान केल्यानंतर आजीबाईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. पण, काही वेळाने आजींची तब्येत बिघडली. आजींना तत्काळ दवाखान्यात हलविण्याची तयारी सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आजींनी १२ वाजता मतदानाचा हक्क बजावला व दुपारी २:४५ वाजता जगाचा निरोप घेतला.