जळगाव (प्रतिनिधी) :- सेवा ही खूप मोठी संकल्पना आहे. आई-वडिल, परिवार, समाज, धर्म यांची सेवा केल्याने आपल्याला परमार्थ प्राप्त होतो. निस्वार्थ भावनेतून प्रसन्नतापूर्वक सेवा केल्याने पूण्यप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. संसारात एकमेकांची सेवा आणि सहकार्यातून प्रत्येक जीव जीवन जगत आहे. ज्यावेळी बाळ जन्माला येते त्यावेळी त्याचे परमेश्वर म्हणजे आई त्यानंंतर वडील असते. शास्त्रात आईला पृथ्वी आणि वडीलांना परमेश्वर म्हटले आहे. त्यामुळे श्री. गणपतीजी ने ज्यावेळी आपल्या आई-वडिलांना प्रथम स्थान दिले त्यामुळे सर्व देवतांमध्ये गणपती आद्य पूजनीय ठरले. श्री गणेशाप्रमाणे सर्वप्रथम आई-वडिलांची सेवा करा. त्यांना वृद्धाश्रमांकडे पाठवू नका. ज्या सुना किंवा मुलं सासू-सासऱ्यांना डस्टबीन समजतात त्यांच्यासाठी ते सेफ्टीपिन प्रमाणे कार्य करतात हे डोळसपणे अनुभवले पाहिजे. आई-वडिलांविषयी ऋण व्यक्त करताना त्यांच्या यश आणि गौरव वृद्धीकडे हेतूपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. आध्यात्मीक जीवनातील उन्नतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले पाहिजे. आईच्या वात्सल्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही. मनुष्याला झाडापासून सावली-फळे-फुले मिळतात. नदी पासून पाणी मिळते. गाय- म्हैस सुद्धा दूध देते तर मनुष्यानेसुद्धा दुसऱ्यांप्रती सेवाभाव जोपासला पाहिजे. हे प्रत्येकाचे दायित्व आहे, असे विचार आज धर्मसभेत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.
आरंभी प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सहनशील आणि कर्मबंध यावर विचार व्यक्त केले, आज जे शरिर मिळाले, पद-पैसा मिळाला, ज्ञान-समृद्धी आली, चांगला धर्म मिळाला हे आपल्या पूर्वाश्रमीची चांगल्या कर्माचे फळ आहे. परिस्थिती अनुकूल असो का प्रतिकूल असो सहनशील बना आणि तपस्यांच्या माध्यमातून त्याग वृत्ती ठेवा, दुसऱ्यांसाठी सहनशील आणि स्वत: ला आगीत तापवा जेणे करून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता येईल, असे विचार त्यांनी मांडले.