जळगाव शहरातील खेडी बुद्रुक भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खेडी बुद्रुक भागात सततच्या कौटुंबिक वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर आणि मुलावर वार करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनसगाव येथे माधुरी समाधान सपकाळे (वय-३५) ही महिला पती समाधान सपकाळे व मुलगा ऋषभ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. माधुरी सपकाळे व त्यांच्या पती समाधान सपकाळे यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होत आहेत. या सततच्या वादाला कंटाळून माधुरी सपकाळे ह्या आपला मुलगा ऋषभ यांच्यासह जळगाव शहराजवळील खेडी बुद्रुक येथे नातेवाईकांकडे राहत आहे. दरम्यान, गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच सुमारास समाधान सपकाळे हा माधुरीच्या घरी आला. घराचा त्याने दरवाजा तोडत आत प्रवेश केला.
यानंतर त्याने पत्नी माधुरी सपकाळे आणि मुलगा ऋषभ सपकाळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात त्या दोघांना जखमी करत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी समाधान सपकाळे याने दिली. ही घटना घडल्यानंतर दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता माधुरी सपकाळे हिने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस स्टेशनला संशयित आरोपी समाधान सपकाळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे करीत आहे.