जळगावात ५ घरगुती सिलिंडरसह साहित्य जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना घरगुती सिलिंडरचा साठा करून ठेवण्यासह गॅस भरणाऱ्या आसिफअली उस्मानअली (२९, रा. पिंप्राळा हुडको) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५ सिलिंडर व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई दिनांक ७ नोव्हेंबर रोजी पिंप्राळा परिसरात करण्यात आली. रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वीच इच्छादेवी चौकात वाहनामध्ये गॅस भरताना स्फोट होऊन १० जण भाजले गेले होते. त्यात उपचारादरम्यान एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. यानंतर अवैध गॅस भरणा केंद्रांवर कारवाईचे निर्देश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले. त्यात पिंप्राळा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा विनापरवाना साठा करण्यासह गॅस भरला जात असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. पथकाने पिंप्राळा परिसरातील लाकडी वखारीसमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये आसिफअली हा एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना आढळला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत भरलेले दोन सिलिंडर, रिकामे तीन सिलिंडर, रेग्युलेटर, इलेक्ट्रिक मोटार असे साहित्य जप्त केले. त्याच्यावर कारवाई करून रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तांबापुरा परिसरात देखील अशाच प्रकारे अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती असून पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत नागरिकांचे म्हणणे आहे.