जळगाव (प्रतिनिधी) :- शील म्हणजे व्यक्तीचे वर्तन,चारित्र्य असते. ज्या ठिकाणी गेले की कुशील बनते अशा ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. ज्या ठिकाणी गेले म्हणजे आपले आचार विचार विकृत होऊ शकतात त्या गोष्टींमध्ये आपल्याला सहभागी व्हायचे नाही अशी पक्की खूणगाठ मनात बांधावी असे आवाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून केले.
कालच्या प्रवचनात महाराज साहेबांनी प्रदर्शन व स्वदर्शन याबाबत सांगितले होते. तोच मुद्दा घेऊन त्यांनी सांगितले की, जैन बांधवांच्या घरी पुढील पिढीने प्रीवेडींग शुटींग हा नवा प्रघात सुरू केला. त्याला काही ठिकाणी ज्येष्ठांची मूक संमती असते. खासगी आयुष्याचे ते क्षण लग्नात मोठ्या पडद्यावर अबाल वृद्ध बघतात. जैन विवाह समारंभात खाण्याच्या पदार्थांना तर मर्यादा नाहीच. जैनांच्या विवाहात जैन फूड असा स्टॉल लागावा? अशा ठिकाणी न जाण्याची मानसिकता आपली का होत नाही? आता तर पिता आणि पुत्र सोबत बसून मद्यपान करतात? हे पुढारलेले विचार वाटत असले तरी ते अधोगतीकडे नेणारे ठरतात. आपले आणि आपल्या राष्ट्राचे चारित्र्य सुरक्षीत ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उत्तराध्यायन सुत्रच्या अध्यायांचा गोषवारा समजावून सांगितला. यात महत्त्वाची गोष्ट अशी की, जो जीव आसक्त असतो त्याला कधीही सद्गती प्राप्त होत नाही. या संदर्भात राजा आणि त्यांच्या गुरुंची गोष्ट सांगितली. राजाने राणीबद्दल मनात आसक्ती ठेवली त्यामुळे त्याला पुढील जन्मी किड्याच्या रुपाने जन्म घ्यावा लागला. म्हशीच्या पारडूला जलाशयाच्या थंड पाणी पिण्याची आसक्ती असते त्या आसक्तीमुळेच ते पारडू मगरीचा शिकार ठरते आणि तो आपला जीव गमावून बसतो. सुखाची आसक्ती केली तर त्याचा काय परिणाम होतो याही गोष्टीबाबत त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे सांगितले.