जळगाव तालुका पोलीस स्टेशनची शोधमोहीम फळाला
जळगाव (प्रतिनिधी) :- झोळीत झोपलेली अन् बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या कोवळ्या बालिकेचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तालुका पोलिस स्टेशन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध लागला आहे. सलग दोन दिवसांपासून बेपत्ता बालिकेचा शोध लागल्यानंतर तिच्या आईचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बालिका बेपत्ता असल्यामुळे ती अन्न पाण्यावाचून भुकेने व्याकुळ होऊन अशक्त झाली होती. तिला तातडीने वैद्यकीय उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बालिकेचा शोध लागण्यात थोडा जरी विलंब झाला असतं तर कदाचीत ती नक्कीच दगावली असती असे वैद्यकीय अधिका-यांनी पोलिसांना कथन केले. मात्र मजूर परिवारातील काटक शरीराची बालिका सुखरूप जीवंत राहिली. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील पावरा कुटुंब जळगाव तालुक्यातील देवगाव येथे गेल्या सहा महिन्यांपासून मोलमजुरी करण्यासाठी आले आहे. आमश्या पावरा, त्याची पत्नी हिराबाई, एक मुलगा आणि दोन मुली असा त्याचा परिवार एकत्र रहात होता. दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमी प्रमाणे हे आदीवासी मजूर कुटुंब कपाशी वेचण्याकामी मोलमजुरी करण्यासाठी गेले. देवगाव शिवारातील गिरणा नदीपात्राच्या किनारी हे कुटुंब शेतमालकाची पत्नी आणि सुनेसोबत कपाशी वेचण्याचे काम करत होते.
दुपारच्या वेळी जेवण आटोपल्यानंतर हिराबाईने तिची दोन वर्षांची मुलगी समिना हिस दोन झाडांच्या मधोमध साडीचा झोका बांधून त्यात तिला झोपविले. तिची आई हिराबाई पुन्हा कपाशी वेचण्याकामी शेतात गेली. त्यानंतर पुन्हा दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास हिराबाई परत मुलगी समिना हिस बघण्यासाठी आली. मात्र तिला झोळीत तिची मुलगी दिसली नाही. मुलगी झोळीत नसल्याचे बघून तिचे भान हरपले. हिराबाईने तिच्या सोबत असलेल्या दोघा महिलांच्या मदतीने शेत परिसर पिंजून काढला. मात्र कुठेही तिला तिची मुलगी समिना आढळून आली नाही. अखेर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेत तिने सर्व हकीकत कथन केली. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनत अहिरे, पोउनि गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, रवी नरवाडे, अतुल वंजारी, संजय हिवरकर, पोहेकॉ जितेंद्र पाटील, नितीन बावीस्कर, हिरालाल पाटील, विजय पाटील, भारत पाटील, पोहेकॉ बापु पाटील, किरण अगोणे, नरेंद्र पाटील, प्रविण कोळी, प्रदिप राजपुत तसेच आरसीपी पोलीस पथक असा लवाजमा देवगाव परिसरात पोलिस पाटील व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बालिकेच्या शोधकामी जुंपले.
सतत दोन दिवस गिरणा नदीपात्र, शेतशिवारातील केळीच्या बागा, कपाशी शेत, तुर शेत आदी परिसरात बेपत्ता बालिकेचा शोध घेण्यात आला. पायवाटेने अथवा केवळ ट्रॅक्टरने या परिसरात कुणीही जाऊ शकेल अशी परिस्थिती या शेत परिसरात होती. वरिष्ठ अधिकारी स्वत: ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून या परिसरात फिरले. अखेर दोन दिवसांनी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास देवगाव शेत शिवारालगत असलेल्या गिरणा नदीपात्राच्या जवळ असलेल्या तिन दगड़ी देव भागात दगडाच्या कपारीमध्ये ओल्या जागेत शोध पथकासोबत असलेला मच्छीमार मगन परदेशी याच्या नजरेस बेपत्ता बालिका पडली.
सापडलेल्या बालिकेला तातडीने ताब्यात घेत तिला खाद्यपदार्थ देण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ती भुकेली होती. त्यामुळे तिने वेळ न दवडता बिस्किटे खावून आपली भूक शमवली. वैद्यकीय तपासणीकामी तिला लागलीच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला सुखरुपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सापडलेली बालिका झोळीतून पडून पाय घसरून घरंगळत गेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.