नाथाभाऊंना मतदारसंघात जुने मित्र करणार मदत ?
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा रंगतदार लढत घेऊन आला आहे. मागील पंचवार्षिक प्रमाणे यंदाही प्रमुख पक्षांचे तेच उमेदवार रिंगणात आहेत. यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे या आमदार होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांचे पिता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना त्यांचे भाजपातील जुने मित्र मदत करतील अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील पंचवार्षिक वेळी आ. चंद्रकांत पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाठबळ मिळाले होते. त्यावेळी एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात होते. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणीताई खडसे या भाजपाकडून लढल्या. या लढतीत सुमारे २ हजार मतांनी ॲड. खडसे यांचा चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता. यंदा मात्र परिस्थिती बदलली असून चंद्रकांत पाटील हे सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार असून ॲड. रोहिणीताई खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत.
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सून रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी राजकीय पातळीवरील केलेले सर्व प्रयत्न फळाला आले. त्याचे पर्यवसन म्हणजे रक्षा खडसे या केवळ खासदारच नाही तर केंद्रीय राज्यमंत्री देखील झाल्या. आता मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघातून ॲड. रोहिणी खडसे या उमेदवारी करीत असून त्यांच्या विजयासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षात असणारे त्यांचे जुने मित्र यांच्या संपर्कात नाथाभाऊ असल्याची माहिती मिळत असून त्यांचे जुने मित्र यंदा रोहिणीताईंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली.
भारतीय जनता पक्षातील काही कार्यकर्ते मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघात भाजपाचा उमेदवार असावा यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी वरिष्ठांना उमेदवारीसाठी मागणी देखील घातली होती. मात्र अखेर महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाला ही जागा सुटली आणि पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील हे उमेदवार म्हणून घोषित झाले. त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून रोहिणीताई यांना छुपा पाठिंबा असल्याचे सूत्रांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून देखील कळत आहे. त्यामुळे यंदाची लढत रंगतदार होणार आहे.