काँग्रेसचे बंडखोर दारा मोहम्मद रिंगणात
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- विधानसभा मतदारसंघात येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी दुपारी ३ वाजता माघारीची मुदत संपल्यावर एकुण २३ पैकी १४ उमेदवारांनी माघार घेतली असून ९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माघारीनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतीम यादी व चिन्हाचे वाटप निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी जाहीर केली. यावेळी खर्च निरीक्षक तहसीलदार बी .ए . कापसे व यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर उपस्थित होते.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा महम्मद यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. उमेदवारांची अंतिम यादी यावेळी जाहिर करण्यात आली. तसेच चिन्हांचे वाटप उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहिर करण्यात आले. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार काँग्रेस पक्षाचे धनंजय शिरीष चौधरी (हाताचा पंजा), भाजपचे अमोल हरीभाऊ जावळे (कमळ), प्रहार पक्षाचे अनिल छबिलदास चौधरी (बॅट), बहुजन समाज पार्टीचे नारायण हिरामण अडकमोल (हत्ती), वंचित बहुजन आघाडीच्या शमीभा भानुदास पाटील, ऑल इंडिया हिंदुस्तान पार्टीचे खल्लोबाई इनूस तडवी, अपक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद (रिक्षा), आलीफ खालीफ शेख (रोडरोलर), मुस्ताक कमाल मुल्ला (किटली) असे आहेत.