जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अनोळखी तरुणीने व्हॉटसअॅप लिंक पाठवून तरुणाला ४३ लाख २२ हजार ६५३ रुपयांत ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आर.डी.पवार (वय ३२, रा.निवृत्ती नगर, जळगाव) या तरुणाशी दिनांक ३ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अनन्या वर्मा व पुनित भाटिया यांनी व्हाटसअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. व्हाटसअॅप ग्रुपची अॅडमीन असलेली अनन्या वर्मा हिने पवार यांना एक लिंक पाठवली. त्यातील टीपीजी कॅप हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्केपेक्षा जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले.
पुनित भाटिया याने पवार यांच्याशी संपर्क साधून आयपीओ खरेदी केल्यास दुपटीने नफा होईल असे सांगितले. ही कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे भासवले. विश्वास संपादन करुन वेळोवेळी ४३ लाख २२ हजार ६५३ ऑनलाईन नेटबँकीगद्वारे घेतले. ना नफा, ना मुद्दल मिळत असल्याने तरुणाने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.