धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बोरगाव शिवारात बांभोरी बुद्रुक येथे शेतात एक मृतदेह आढळून आला. प्राण्याच्या हल्ल्यात हा इसम ठार झाल्याचा संशय आहे. दरम्यान, वनविभागाने तपासणी करीत याठिकाणी आढळलेले ठसे हे श्वानाचे असल्याचे म्हटले आहे.
हा मृतदेह २१ वर्षीय तरुणाचा दिसून येत आहे. त्याठिकाणी दोन-तीन प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. पोलिस निरीक्षक पवन देसले यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठले व त्या ठिकाणी पाहणी केली. मयत तरुणाची ओळख पटलेली नाही. मृतदेह सुमारे ५० फूट फरफटत नेला होता. पो. नि. पवन देसले यांच्यासह पोउनि. गणेश वाघ, हवालदार दीपक पाटील, सत्यवान पवार, नितीन पाटील, चंदूलाल सोनवणे, वर्षा गायकवाड, राजू पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. मयताची ओळख पटवावी असे आवाहन धरणगाव पोलीसांनी केले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहे.