जामनेर शहरातील वाकी रोड येथे झाला होता अपघात
जामनेर(प्रतिनिधी) : शहरातील वाकी रोडवर झालेल्या भीषण अपघातात येथील कलावंत संतोष सराफ हे जबर जखमी झाले होते. जवळपास त्यांनी दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल उपचार सुरु असतांनाच मृत्यू झाला. एका चांगल्या कलावंताला जामनेरकर मुकले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.
संतोष सुभाष सराफ (वय ३५) असे मृत कलावंताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात एक लहान भाऊ, बहीण, पत्नी आणि चार वर्षाची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. जामनेर शहरातील गजबजलेल्या वाकी रस्त्यावरील ‘माऊली किराणा’ जवळ गेल्या २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला होता. (केसीएन)त्यात सोनेश्वर मंदिराजवळील दर्शन पार्क, वाकी बु.येथील रहिवाशी पथनाट्य कलावंत संतोष सराफ हे सिमेंट मिक्सर वाहनाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रथम जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावल्यामुळे संतोष सराफ यांना मुंबई येथील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांनी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर जामनेर येथे बुधवारी १६ रोजी दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष सराफ हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जामनेर शाखेचे पदाधिकारी होते.