एमआयडीसीतील रेमंड चौकात झाला होता अपघात
जळगाव (प्रतिनिधी) : रुग्णालयात दाखल असलेल्या वडिलांना पाहण्यासाठी जात असताना दुचाकी वरील दांपत्याचा अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते. यात जखमी झालेल्या चंद्रकला विकास पवार (सुप्रिम कॉलनी) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
चंद्रकला पवार यांचे वडील आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी त्या पती विकास सरिचंद पवार (४४, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्यासह ११ ऑक्टोबर रोजी दुचाकीने जात होत्या. रेमंड चौकात दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे पवार दाम्पत्य जखमी झाले होते. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना चंद्रकला पवार यांचा सोमवारी (१४ ऑक्टोबर) मृत्यू झाला.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देण्यात आला होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला यापूर्वी ट्रकचालक अमोल सुरेश कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चंद्रकला पवार यांचा मृत्यू झाल्यामुळे पुढील नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.