जामनेर तालुक्यातील वाकोद-तोंडापूर रस्त्यावर भीषण अपघात
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकोद येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या साखरादेवी यात्रेत दर्शनाला जाताना वाकोदजवळ दुचाकी आणि महिंद्रा पिकअप वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पहूर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कुंभारी तांडा येथील अमोल शिवाजी गोसावी व आशिक गब्बर गोसावी हे वाकोद येथील साखरादेवी यात्रेत दर्शनाला येत होते. दर्शन घेऊन वाकोद येथील आठवडे बाजार असल्याने दसऱ्याचा बाजार करून येतो असं सांगून निघाले. (केसीएन)दरम्यान वाकोद गावापासून हाकेच्या अंतरावर असतांनाच वाकोदकडून तोंडापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (एम. एच. १९ सी वाय २७१७) बोलेरो पिकअप वाहनाने मोटारसायकल एम. एच. २८- बी. एफ ४४०६ समोरून जोरदार धडक दिल्याने अमोल याचा जागीच मृत्यू झाला. अमोल घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घटनास्थळी पहुर पोलीस वेळीच दाखल होऊन सदर जखमीला पुढील उपचारासाठी रवाना केले. तर अपघातगस्त दुचाकी पहुर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली होती.