अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) : ऑक्टोबर महिन्यात पावसाने हाहाकार माजवला असून बोरी पांझरा नद्यांना पूर आला आहे. अक्कलपाडा आणि तामसवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तर शेतांमध्ये पाणी घुसून कापूस, मका, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर नगाव येथे वीज पडून बैल मृत्युमुखी पडला आहे.
यंदा सरासरी पेक्षा जास्त म्हणजे १५० टक्केच्या जवळपास पाऊस पडला आहे. दिनांक १० आणि ११ ऑक्टोबरला वादळी पाऊस झाल्याने काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या.बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटर झाली आहे. धरणाचे ६ दरवाजे ०.३० मीटर ने उघडून ५४१८ क्यूसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. तसेच निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ६ हजार ९७० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.