जामनेर तालुक्यातील सोनाळा शिवारातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : कर्जाच्या वाढत्या बोजामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि.६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुणवंत उत्तम गीते (वय २९, रा.पहूर कसबे ता. जामनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वडील, भाऊ यांच्यासोबत ते शेती करत होते. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी जामनेर रस्त्यावरील सोनाळा शिवारात मॉ कमल हॉटेलच्या पाठीमागील बाजूस एकनाथ गाडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आणि ईश्वर कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन शव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ संदीप पाटील यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे