जळगावातील दादावाडी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून नफ्याचे अमिष दाखवत जळगावातील दोन बहिणींची ६ लाख ५ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरुवातीला दोघींना १ लाख ५ हजार रुपयांचा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला, मात्र नंतर मोठी रक्कम उकळली. हा प्रकार दिनांक २१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान घडला.(केसीएन)या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादावाडी परिसरातील गृहिणी असलेल्या महिलेसह तिच्या बहिणीशी दोन जणांनी व्हाटस् ॲपद्वारे संपर्क साधून त्यांना एका ग्रुपमध्ये ॲड केले.
त्यानंतर महिलेला एक लिंक पाठविली व त्याद्वारे एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दोघं बहिणींनी काही रक्कम गुंतविली व एकीला ३० हजार तर दुसरीला ७५ हजार रुपयांचा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. (केसीएन)त्यानंतर दोघींकडून एकूण सहा लाख पाच हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारले. गुंतविलेली रक्कम व नफाही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यानंतर दादावाडी परिसरातील महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.