चोपडा तालुक्यातील अनवर्दे गावात शोककळा
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवाशी तथा माजी सरपंच महिलेचा दि.५ ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री १०.२५ वाजता नाशिक जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी गावात धडकताच अनवर्दे खुर्द गावावर सर्वत्र शोककळा पसरली.
सविता संजीव शिरसाठ (वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती सामाजिक कार्यकर्ते संजीव शिरसाठ, मुलगा इंजिनिअर पवन शिरसाठ व मुलगी इंजिनिअर अनुष्का शिरसाठ असा परिवार आहे. सविता शिरसाठ ह्या घटस्थापनेच्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर देवी दर्शनासाठी जात होत्या. नाशिक येथील तात्पुरत्या निवासस्थानाजवळून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जत्रा हॉटेल जवळ नाशिक-मुंबई महामार्गावरून जातांना खड्ड्यामुळे त्या दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडल्या.
त्यांच्यावर उपचार सुरू असतांना तीन दिवस मृत्यूशी झुंज देत रविवारी सविता शिरसाठ यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच अनवर्दे गावात शोककळा पसरली आहे.