पहूर पोलीस स्टेशनची कामगिरी
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर गावातील होणाऱ्या घरफोडी तसेच परिसरातील शेत शिवारात वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
परिसरातील शेती शिवारात ईलेक्ट्रीक मोटारींच्या तारा, केबल मोठ्या प्रमाणावर चोरी जात आहेत. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक स्थापन करण्यात आले आहे. गस्तीवर असताना पथकाने फिरोज खाटीक, इरफान शेख, फातिम शेख (रा. मदनी नगर, जामनेर) हे संशयास्पदरित्या आढळून आले.
त्यांना ताब्यात घेत अटक करून त्यांच्याजवळील साडेसात हजार रुपयांची रोकड व लोखंडी टॅमी जप्त केली. याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गस्तीपथकात दीपक सुरवाडे, विनोद पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, राहूल पाटील, अमोल पाटील, गोपाळ गायकवाड यांचा समावेश होता.