जयेश मोरे, नेहा देशमुख, अभिजित त्रिपणकर यांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ घोषित करण्यात आले असून राज्यातील २९ खेळाडूचा समावेश आहे. तर ९ विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात जळगावच्या पोलीस दलातील साफ्टबॉल खेळाडू जयेश यशवंतराव मोरे, नेहा नितीन देशमुख, कॅरमपटू अभिजीत दत्तात्रय त्रिपणकर यांचा समावेश आहे.
लवकरच राज्यपालांहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. जळगाव पोलीस दलातील पोलीस जयेश यशवंतराव मोरे यांना सॉफ्टबॉल या क्रिडाप्रकारात शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. जयेश मोरे, हे सॉफ्ट बॉल या खेळातील उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत. आतापर्यंत ते (वर्ल्ड कप) अर्जेंटिना (पराना) आणि (वरिष्ठ गट एशिया कप) जपान (टोकियो) येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
तसेच सलग सात वर्ष महाराष्ट्राच्या संघाने पदक प्राप्त केले त्या संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धा, फेडरेशन कप, राज्यस्तरीय स्पर्धा यात महाराष्ट्राचे, जळगावचे प्रतिनिधित्व केले आहे. या पुरस्कारासाठी प्रा. डॉ प्रदीप तलवलकर, राज्य सचिव, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघ, संघ मार्गदर्शक किशोर चौधरी यांच मार्गदर्शन लाभले आहे. जयेश मोरे हे जि.प. विद्यानिकेतन व कानिष्ठ महविद्यालय जळगावचे माजी प्राचार्य प्रा. यशवंतराव मोरे व ज्योत्स्ना मोरे, रांजणगाव ता. चाळीसगाव यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत.