वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची पत्रपरिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेती आधारित किमती, शेतीमालाच्या किमती हे प्रश्न मागे पडलेले दिसत आहे. यावर राजकीय पटलावर चर्चाही होत नसल्याचे वक्तव्य चोपडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकारला मराठा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळे द्यावे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असेल. निवडणूक याच्याच अवतीभोवती फिरेल व याच मुद्द्यावर लढवली जाईल अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्यातील विविध आदिवासींना एकत्र करून चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन परिषद घेण्यात आली. यापूर्वी पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधला.
ओबीसीच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिल्याने व ती सोडवली नाही म्हणून तो कळीचा मुद्दा बनला आहे. जरांगे पाटलांची ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी आहे यावर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही मात्र ओबीसी संघटनांनी भूमिका घेतलेली आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये अशी भूमिका घेतली आहे. त्याला आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे. ओबीसींचे आरक्षण ओबीसीलाच राहिले पाहिजे त्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करता कामा नये सरकारला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका असेल असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.