चिनावल ग्रामपंचायत राज्यात प्रथम , जळगाव जिल्हा परिषद नाशिक विभागात सर्वोत्तम
अमळनेर (प्रतिनिधी) : राज्य शासनातर्फे दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान झालेल्या माझी वसुंधरा ४.० अभियांनातर्गत नाशिक विभागातून अमळनेर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक मिळवला असून मोठ्या ग्रामपंचायतीत जळगाव जिल्ह्यातील चिनावल ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे.तर जळगाव जिल्हा परिषद नाशिक विभागात सर्वोत्तम ठरली आहे.

सुमारे ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदेत नाशिक विभागात खान्देशातीलच शिरपूर वरवाडे नगरपरिषद द्वितीय तर शहादा नगरपरिषदेने तृतीय क्रमांक मिळवला आहे. नाशिक विभागात अनुक्रमे ७५ लाख ,५० लाख ,५० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. चिनावल ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम आल्याबद्दल १.७५ कोटी रुपये व मागील अभियानात मिळालेल्या गुणांपेक्षा अधिक भरारी उंच उडी प्रकारात ५० लाख असे एकूण सव्वा दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. १५ ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत शेंदुर्णी नगरपंचायत नाशिक विभागात प्रथम तर बोदवड नगरपंचायत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
त्यांना अनुक्रमे ७५ लाख व ५० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. सुमारे १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत जळगाव जिल्ह्यातील केरहाळे बु ग्रामपंचायत नाशिक विभागात प्रथम आली असून ७५ लाख रुपये बक्षीस मिळवले आहे. तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत धुळे महापालिका राज्यात तिसरी आली असून पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.









