भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील घटना, संशयिताला अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे प्रेम संबंधातून नेहमी होणाऱ्या भांडणाचा शेवट गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता अंत झाला. तरुणाने विवाहितेवर चाकूचे वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना ग्रामस्थांच्या समोर घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.
सोनाली महेंद्र कोळी (वय २८ रा. साकेगाव ता. भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गावात पती व लहान मुलांसह राहत होती. गावातीलच सागर रमेश कोळी (वय २८) याच्यासह तिचे प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधमधून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे.(केसीएन)बुधवारी दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गावात सागर रमेश कोळी याने सोनाली महिंद्र कोळी हिच्याशी पुन्हा भांडण उकरून काढले. भांडणामधून सागर कोळी याने सोनाली कोळी हिच्या पाठीवर, पोटाच्या बाजूला, उजव्या हाताला, चाकूने भोसकून जबर दुखापत केली. त्याला अडवण्यासाठी फिर्यादी विनोद सुभाष कुंभार (वय २८ वर्ष) हे धावले असता सागरच्या हातातील चाकू विनोद यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली.
यावेळी सागर कोळी याने विनोद कुंभार यांना धमकावले. तू मध्ये आलास तर तुलाही मारून टाकीन असा दम दिल्यामुळे तेथे उपस्थित इतर ग्रामस्थ देखील सागर कोळीच्या हातातील चाकू पाहून पुढे सरसावले नाही. सागर कोळी तेथून गेल्यावर जखमी सोनाली कोळी हिला रक्तस्त्राव होत असल्यामुळे गावातील आनंद ठाकरे यांनी त्यांच्या खाजगी वाहनाने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सोनालीला तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे साकेगावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत नशिराबाद येथे ओरिएंट सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक असलेले विनोद सुभाष कुंभार (वय २८ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहेत.