मुंबई जिल्हा ग्राहक आयोगाचा बालाजी ट्रॅव्हल्सला दणका
जळगाव (प्रतिनिधी) : आरक्षित तिकीट असतानाही नियोजित बस रद्द केल्यामुळे व मानसिक त्रास झाल्यामुळे मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने श्री बालाजी ट्रॅव्हल्स, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, जळगाव यांना दणका दिला आहे. प्रवासी योगेश एकनाथ वानखेडे यांना १०,००० रुपये मानसिक त्रास, १,९०० रुपये तिकीट परतावा आणि ५,००० रुपये न्यायालयीन खर्च देण्याचा आदेश २८ ऑगस्ट २०२४ रोजी पारित केला आहे.
प्रवासी योगेश वानखेडे यांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी जळगावहून कल्याण आणि १ ऑक्टोबर २०२० रोजी परत येण्यासाठी बालाजी ट्रॅव्हल्सकडून तिकीट बुक केले होते. मात्र, नियोजित बस जळगाव येथे वेळेवर न आल्याने वानखेडे यांना तीन तास थांबावे लागले आणि शेवटी बस रद्द करण्यात आली. योगेश वानखेडे यांनी आयोगासमोर तक्रार दाखल करताना म्हटले की, बस रद्द झाल्यामुळे ते घरगुती कार्यक्रमास हजर राहू शकले नाहीत. बसच्या रखडलेल्या वेळापत्रकामुळे, बस नादुरुस्त ठेवल्यामुळे आणि योग्य वेळी माहिती न मिळाल्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.
आयोगाने बालाजी ट्रॅव्हल्सच्या या सेवा त्रुटींसाठी व अनुचित व्यापार पद्धतीसाठी ट्रॅव्हल्स चे मालक धीरज काबरा आणि दीपाली काबरा यांना दोषी ठरवत योगेश वानखेडे यांना १०,००० रुपये मानसिक त्रास भरपाई, १,९०० रुपये तिकीट परतावा आणि ५,००० रुपये न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. आणि विशेष म्हणजे यात तक्रारदार यांनी कोणतेही वकिलांची मदत न घेता स्वतः त्यांची बाजू आयोगासमोर मांडली.