राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कुलगुरूंना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशाळांपर्यंत विद्यार्थी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली. विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख निशांत चौधरी, जळगाव महानगर विद्यार्थी अध्यक्ष फैजान राजू पटेल, हर्षल दहीकर, जयेश पाटील आणि रितेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारत आणि विविध प्रशाळांपर्यंतचे अंतर तीन किलोमीटर असल्यामुळे विद्यार्थ्यांना चालत जावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः मुलींसाठी उपलब्ध सायकल सुविधा सोयीची नाही, तसेच त्या सायकलींची स्थिती खराब आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सेवा (जसे की व्हॅन) उपलब्ध करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या निवेदनात विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे.