पुणे (वृत्तसंस्था) – चहा प्यायल्याशिवाय काही जणांच्या दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते. जोपर्यंत गरम चहाचे घोट पोटात जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. चहा प्यायल्याने तरतरी येते, ऍक्टिव्ह वाटते, असा समज आहे.
सकाळी उठल्यानंतर बरेच जण पाण्याऐवजी पहिले चहाच पिणे पसंत करतात. चहा पिऊन दिवसाची सुरुवात करणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. रिकाम्या पोटी चहा पिणाऱ्यांना असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण हे चहा प्यायल्याने नाही तर चहामध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे होतं. आपल्याला ऍक्टिव्ह, तरतरी, उत्साह वाटतो पण हे सगळा कॅफिनमुळेच.
1. आतड्यांमधील बॅक्टरीयावर होतो परिणाम – आपल्या शरीराची पचनप्रक्रिया सुरळीत ठेवण्यामध्ये आतड्यांमधील बॅक्टरीयाची भूमिका महत्वाची असते. आरोग्य निरोगी राहण्यासाठी पचन संस्थेच कार्य सहज होण्यासाठी बॅक्टरीया मदत करतात. पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने या बॅक्टरीयाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. पोट स्वच्छ नसल्याने तोंड येणे यांसारख्या समस्या समोर येतात.
2. लघवीला जास्त होणे – सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते. चहामधील कॅफिन आणि अन्य घटक शरीरातील पाणी बाहेर फेकण्याचं काम करतात. यामुळे आपल्याला सतत तहान लागते आणि वारंवार लघवीला जाण्याची वेळ येते. जास्त प्रमाणात चहा पिणाऱ्यांना रात्री वेळी अवेळी देखील लघवीला जाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. अति चहा प्यायल्याने शरीर जड होते.
3. पोट स्वच्छ होत नाही – रिकाम्या पोटी चहा पिणाऱ्यांमध्ये पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार जास्त पाहायला मिळते. दिवसाची सुरुवातच चहा पिऊन केल्यास ऍसिडिटीचा त्रास होतो. जास्त गरम चहा प्यायल्यास अल्सर देखील होऊ शकतात.
4. चहाचे अतिसेवन – बरेच जणांना जास्त चहा प्यायची सवय असते किंवा भूक मारण्यासाठी चहाचे सेवन करतात. अति चहा प्यायल्याने ह्रदय विकार होण्याचा धोका असतो. चहामधील कॅफिन मुळे अनिद्राच्या समस्या वाढतात. यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. चहामुळे ह्रदयात जळजळ होणे, चिंता, तणाव वाढतो.
5. जास्त चहा घेतल्याने शरीरात ऊष्णता निर्माण होते व चेहऱ्यावर, मानेवर पिंपल्स येतात. चेहरा तेलकट होतो.
काय टाळावे -रिकाम्यापोटी, जेवल्यानंतर, अति उकळलेला चहा पिणे टाळावे.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर
संपर्क : 7385728886.